
श्री बराकभाऊ ओबामा यांना पत्र
।।श्री रोडकामाय प्रसन्न।।
तीर्थस्वरूप आदरणीय श्री बराकभाऊ ओबामा
पांढरे घर, आम्रिका!
यांचे शेवेशी सादर प्रणाम!
तुम्हाला वाटंल, की कस्काय बुवा या माणसानं पत्र धाल्डं आपल्याला! सगळेच खुलासे एकच डाव नाही करता येत नं भाऊ! एक एक करतो, जरा दमानं घे. आता, हाओ मी खेडय़ातला माणूस. पण धाव्वी शिकेल हाये. धाव्वी, म्हणजी मॅट्रिक झाल्यावरबी मला ‘व्हाइट हाउस’ म्हाईत नाही का काय, आसं तुझ्या शेक्रेटरीले वाटंल (हे पत्र आधी तुझा शेक्रेटरी वाचंल आन मंग ते तुझ्यापत्तर येईल, यवढं साधं गणीत तं माहीतच आहे गडय़ा मला.); पण सांगाची गोष्ट म्हंजे- गेल्साली मी शिवशेनेत होतो आन् या साली राज-शेनेत एण्ट्री घेतली. राज-शेनेला आमी मन्शे म्हंतो, पण त्येच्या डिटेलमंदी आता जात नाही. आन् माज्या शेनेचं सांगतलं, कारण मन्शेत गेल्यावर आमी ‘व्हाइट हाउस’ला ‘पांढरं घर’ म्हणा लागलो. ह्य़ेच्यावरबी आधी चर्चा झाली. व्हाइट म्हंजी पांढरं, ह्य़ेला सगळे पैल्याछूटच राजी झाले. पण ‘हौस’ म्हंजी घर, का ‘हौस’ म्हंजी ‘एक हौस पुरवा म्हाराज, मला आना कोल्लापुरी साज’- आसली हौस, ह्य़ेच्यावर लय वाद झाला. मंग एका धाव्वी नापासनं ‘हौस’चं स्पेलिंग दाकवलं आन् त्येचा आर्थ घर आसाच होतो, हे प्रू केलं. लय भारी लोक हायेत आमच्या गावातले. आम्रिकेत सगळे गोरे लोकं राह्य़तेत नं? त्येन्ला आम्ही पांढरे म्हणतो. तं आमच्या गंग्या बोल्ला का, पांढऱ्या लोकायनं लय हौशेनं बांधल्यालं घर म्हंजी व्हाइट हाउस आसंल. तं, अशी मजा आली भाऊ! दुसरीबी एक मजा सांगतो. मी धाव्वी हाये हे आधी सांगतलंच हाये. तं धाव्वी आसून आमेरिका हा वर्ड आम्रिका आसा लेहिला, त्याचं आश्शर्य वाटलं आसंल ना? तं, त्याचं काय हाये, आमचा परभ्या जरा जास्त शिकेल आन् जरा जास्त हुशार हाय. त्यो म्हण्ला की तू- म्हंजी बराकभाऊ काळा हाये, तं आता आमेरिका हे नाव आफ्रिकासारकं आम्रिका लेहायले पाह्य़जे. भल्तीच बेस्ट वाटली आम्हाला ही आयडिया. तं, सागाची मेन गोष्ट तं राहूनच गेली. परवा आमचा केशा आम्रिकेतून वापस आला, त्येच्या संबंधीबी लेहायचं होतं. त्येची पण एक मजा सांगतो. केशा वापस आला आन् चौकात भेटला. म्हटलं, भाऊ, काऊन वापस आला रे आम्रिकेतून? तं म्हणे, ‘तिकडं मंदी आली म्हणून वापस आलो.’ म्हटलं त्याले, ‘‘काऊन खोटा बोलतं रे? देशमुखाची मंदी तं कालच पाह्य़ली म्या कालेजात जाताना, सायकलला पायडल मारत.’’ मंग केशानं समजाऊन देल्लं- मंदी म्हंजी आपली मंदी न्हाय. मंदी म्हंजी तुटवडा पल्डा. आपल्याकडे चार-आठ आण्याचा तुटवडा पल्डा की कन्डक्टर चाराने वापस द्याचे तं धा पैशाचं चाकलेट देतो आन् आपणबी ते तोंडात घालून गप ऱ्हातो. तं मदीचं सांगत होतो, केशा ‘आपली मंदी’ म्हणला तेव्हा खुशी वाटली होती. पण बराकभाऊ, खिशात मंदी आसंल तं मनात देशमुखाची मंदी आणून काय उपेग म्हणा! केशाच्याच घरी बसून टी. व्ही.वर तुमचा शपतीचा कारेक्रम पाह्य़ला. या कारेक्रमासाठी सात आरब खर्ची पडले, आसं टी. व्ही.वर सांग्ांतलं. तं, आधी मला वाटलं का, तिकडं त्या गाझापट्टीमधी आरब खर्ची पडत्येत नं, त्याची म्हाईती सांगते का काय टी. व्ही.वर! केशा म्हण्ला, ‘आता यवढय़ा चांगल्या कारेक्रमात तिकडल्या आरबायची आठोन कोण कशाला काढंल?’ मंग त्यानं सात आरब म्हंजी किती रुपये होतेतं, त्येचा हिशेब सांगतला.त्या ऐकून म्या हडबडलो गड्या .. अरे इतक्या पैशात आमच्या आख्या तालुक्याचे भले झाले असते न भाऊ .. पण जाऊदे तुझा पैसा हाय कसा खर्च करायचं ते तू ठरवणार म्हना.. तं मी म्हण्लो, ‘काय रे केशा, आम्रिकेत मंदी हाये आसं खोटंच सांगून पाठवलं की काय वापस तुला भारतात?’ परेशान तं झालाच केशा माझा सवाल आयकूनं, पण बोल्ला नाही तसा. तं, सांगाचा मुद्दा आसा की, केशाला वापस कामावर घिऊन टाक. तिकडं मंदी आली म्हणून तो इकडंबी मंदीच्या मागं मागं आसतो. केशा आम्रिकेत आसताना मी एक डाव मंदीच्या सायकलची चेन लावून देल्ली होती. तेव्हापासून ती हासती कधी कधी. केशा आपला मित्र हाय, त्याच्याशी मंदीवरुन उगा दुस्मनी नको. तं मेन पॉइंट आसा, की राज-शेनेचा मी या गावचा मुख्य हाये. आन् म्हणून तुम्ही (तू म्हणावं का तुम्ही, यात या पत्रात लय घोळ झाला बगा.) आम्रिकेचे मुख्य झाल्याचं अभिनंदन, म्हणून हे पत्र.
ता. क. (आसं पत्राच्या शेवटी लेहेतात बग)- तं लेहायचा एक पाइंट राहून गेला. आता जरुरीची कामं संपली की एक डाव भारतात ये बराक भाऊ! पण एक गोष्ट कर गडय़ा तू बराकभाऊ.. भारतात येशील तवा फक्त भारतातच ये, उगा जाता जाता पाकिस्तानलाबी नको जाऊ. न्हाई तं, देशमुखाची पोरगी पाहाला जाचं आन् जाता जाता पवारायची पोरगीबी पाहून टाकाची- आसं नको करू. बरं, संपवतो आता. पत्राला उत्तर दे आन् खर्च जरा जपून कर.
तुझाच,
रंगाने शेम असलेला मित्र.
