Thursday, November 25, 2010

आमची नाटकगिरी


आठवणींचा खजिना जर तुम्हाला साठवायचा असेल सुखद किंवा दु:खद तर तुम्हाला नाटकात काम केलेच पाहिजे. कोणत्याही .. मग ते कॉलेज चे असो , शाळेतले असो, सोसाइटी मधले असो, गणेशोत्सव मधले असो , गल्लीतले असो, स्पर्धेतले असो वा व्यावसाइक असो. प्रत्येक प्रयोग हा तुम्हाला नक्की काही ना काही देऊन जातो.
मी ही या सर्व प्रकारात नाटके करू शकलो . अनेक मजेदार आठवणी गोळा केल्या आहेत . जवळ जवळ सात व्यावसाइक नाटके मी केली आता विचार करा माझ्या कडे कित्ति आठवणी असतील.. व्यावसाइक नाटक हे एक संपूर्ण कुटुंब असते. प्रत्येकाची सुख दु:खे वाटून घेतली जातात .. अनेक मजेदार प्रसंग ही असतात..
मी आज लिहिणार आहे अशाच एका दौर्या बद्दल. नाटक देह्भान..दिग्दर्शन कुमार सोहोनी, लेखक अभिराम भडकमकर, कलाकार होते डॉक्टर गिरीश ओक, नीना कुलकर्णी, स्मिता सरवदे, मुक्ता बर्वे, ययाती राजवाडे, शाम तेंडोलकर व मी. या नाटकाला त्या वर्षीची सर्व पारितोषिके मिळाली होती. सरकारी पारितोषिकचा प्रयोग गोव्यात ठेवला होता. निर्माता दत्ता घोसाळ्कर म्हणाला की आपण दापोली ला एक प्रयोग करू तिथून दुसऱ्या दिवशी रत्नागिरी करू व तिथून गोवा.. मज्जा येणार हे स्पष्टच होते.
संपूर्ण तयारी करून अखेर बस सुटली.. टूर मोठी असली की अनेक गोष्टी पाहाव्या लागतात ..अगदी गाडीत एखादा एक्सट्रा डिझेल चा कॅन पण असतो.. आता चारदिवस नुसती धमाल.. दापोली ला रंगमंच नाही. तिथला प्रयोग हा झापाच्या थियेटर मधे होतो.
एक मोठी आमराई आहे तिथे स्टेज बांधला जातो व समोर खुर्च्या मांडून प्रयोग होतो. साउंड सिस्टम यथा तथाच असते त्यामुळे घसा फाटे पर्यंत ओरडून बोलावे लागते व प्रयोग संपला की आवाज बसतो.
तर आमची बस बराच प्रवास करून दापोली च्या आमराइत पोहोचली.
आंब्याचा सीज़न होता.. आमराई हापूस आंब्यानी ओथम्बली होती. मस्त वास येत होता आंब्यांचा. एकदूम फ्रेश वाटत होते. इतका प्रवास करून असे सुधा अंग आंबून गेले होते.. बस मधून बाहेर आल्या बरोबर मुले दहा दिशाना पांगली.. कोण इथे तर कोण तिथे केवळ हाताच्या अंतरावर असलेले व कधीही न अनुभवलेले सुख अनुभवत होता .. आंबे चोरत होता.. थोड्याच वेळात आमच्या बस मधला पॅसेज हा आंब्यानी भरून गेला.. मी ही सात आठ आंबे चोरले होते..
त्यातला एक पिकलेला आंबा खात खात मी गिरीश ओक ना शोधत होतो. त्यांची आंब्याची आवड मला ठाऊक होती. कोणीतरी म्हणाले की गिरीश ओक त्या तिथे कॉर्नर वरील घरात चहा पितायत.. मी धावातच तिथे गेलो कारण असा चोरीचा मौका पुन्हा मिळणार नव्हता.. " गिरीश काका चला.. सॉलिड आंबे लागलेत .. आपल्या पोरानी आंब्यानी आक्खी बस भरलीय " गिरीश ओकांचा चहाचा कप हातातच थरथरत होता .. ते म्हणाले ' यांना भेट.. तुझी ओळख करून देतो .. हे प्रभावळकर.. या आमराई चे रखवालदार..'. मला प्रभावळकरांचा रागाने लाल झालेला चेहरा व प्रभावळकरांना मझा भीतीने पांढरा पडलेला चेहेरा स्पष्ट दिसला होता. त्यानंतर प्रत्येक आंब्यात मला प्रभावळकर दिसत. असो.

दहा वाजता प्रयोग सुरू झला ..स्टेज असा बांधला होता की प्रेक्षकाना मेक अप रूम ही बाहेरून दिसत होती. तीन वेळा लाइट्स गेले .. लोड शेडिंग .. प्रेक्षकात लहान मुले धूमाकूळ घालत होती..मागे बसलेली काही गावातली टवाळखोर मुले नको तिथे हसत होती. तरीही प्रयोग व्यवस्थित पार पडला.

चला आता रात्रीचे जेवण झाले की निघालो आम्ही पुढे.. मग कोण येतोय कशाल एवढ्यात या आमराइत. जेवण प्रभावळकर यानीच अरेंज केलाय हे ऐकून पोटात गोळा आला. मी पटापट जेवलॉ व बाहेर गेलो . फारच लाज वाटत होती. अनेकांचे दारू काम ही सुरू होते. आता रात्रभर प्रवास करायचा म्हणजे झोप चांगली लागावी म्हणून होते ते. नाटकाच्या बस मधे स्लीपर असल्याने झोप मस्त लागते. त्यात पोटात दारू असेल तर विचारूच नका. मी तेव्हा ही दारू पासून दूर होतो.. खरच सांगतोय. रात्री साधारण 1.30 वाजता सर्व जण बस मधे आपापल्या जागी झोपले व बस सुटली.

रात्री अचानक मला जाग आली .. किती वाजलेय ? काही दिसत नवते .. गाडीची घर घर सुरू होती.. सर्व दिवे बंद असल्याने काळोख होता.. फक़त त्या बस च्या घर घरीत ही निर्मात्याचा घोरण्याचा आवाज येत होता.. उकाडा जाणवत होता म्हणून मी खिडकी उघडली.. पण काही वारा येईना.. मला ही कदाचित परत झोप लागली असावी.. पुन्हा जाग आली तेव्हा मात्रा मी जरा जास्त सावरलो.. गाडी च्या इंजिन चा आवाज येत होता पण गाडी पुढे जात नव्हती बहुदा. मी माझ्या स्लीपर वरून खाली उतरलो व अंधारात चाचपडत मामा च्या केबिन मधे पोहोचलो. ( काळोखात एक ही आंबा पायाखाली कसा आला नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल ..कारण मघाशी मीच म्हणालो की आमच्या बस चा पॅसेज आंब्यानी भरला होता असे... पण आमची बस सुटण्या आधीच आम्ही जेवत असताना प्रभावाळकरानि बरेच से आंबे परत काढून घेतले होते परस्पर बस मधून.. चोर साला ) मामा च्या केबिन मधला दिवा सुरू होता व मामा घामाने भिजला होता..
" काय रे मामा काय झाले बस पुढे जात नाहीय का?..
अरे काय सांगू स्पेशल पडत नाहीय..
म्हणजे?..
अरे स्पेशल गियर असतो ना घाट चढायला तोच अडकलाय, त्यामुळे गाडी चढणीवर अडकलीय..
अरे मग आता रे?..
आता काय मघा पासून प्रयत्न करतोय.. च्यायला या दत्ता च्या .. तरी सांगत होतो सर्विस करून घे मोठा दौरा आहे.. पण माझे ऐकेल तर ना.. मरा आता...
आपण कुठेशी आलो आहोत?...
माहीत नाही 2 तास गाडी चालवली आहे..
अरे पण बाहेर तर जंगल दिसतेय.. आता करायचे काय?.
.आता धक्का मारा ..
काय??? मी एकटा..
अरे सगळ्याना सांग
सगळी पोरे दारू पोऊन झोपली आहेत कोणी उठणार नाही
थांब कशी उठत नाही तेच पहातो.. असे म्हणून मामा ने गाडी चे आतले सर्व दिवे लावले व जोरदार गाणी लावली.. काळू बाई च्या लग्नाला नवरी नट ली ..
आई चा घो या मामाच्या , भडव्याला हीच वेळ मिळा ली गाणी ऐकायला अशा अनेक मस्त तरतरीत शिव्या मामा च्या नवे सुटत होत्या व मी सर्वाना परिस्थितीची कल्पना देत होतो. अनेकानी अनेक प्रकारे प्रयत्न करून पहिले पण गाडी जागची हालायला तयार नव्हती.. अखेर सर्व जण खाली उतरले .. सर्व बायका जरा बाजूला होत्या ( मुक्ता धक्का कसा मारावा हे बाजूला उभे राहून शिकवत होती .. नीना ताई च्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.. स्मिता झोपेत उभी होती ) व सर्व पूरूष धक्का मारायचा प्रयत्न करत होते.. लोडेड गाडी, चढण आणि पोटात दारू या परिस्थितीत हे सोप्पे नव्हते हे कृपया लक्षात घ्या . शेवटी मामा ने इंजिन बंद केले व खाली उतरला..
जाउ दे तिच्या आयला. सकाळी बघू.. झोपा आता गाडीत.. अजुन जास्त वेळ इंजिन सुरू ठेवले तर रेडियेटर फुटेल.
मरो.. डोळ्यावर सॉलिड झोप होती त्यामुळे सर्व जण पटापट गाडीत जाऊन झोपले.ऊरलेली रात्र कशी बशी काढली. . झोपेत ही मला दत्ता व मामा यांच्या भांडणाचा आवाज येत होता.. असो.

सकाळी 8 वाजता जाग आली तेव्हा बरीच शी बस रिकामी होती.. मी ही खाली उतरलो. सर्व जण खाली 'आसरा' शोधत होते. सकाळी प्रत्येकाला टॉयलेट ला जायचे होते पण आजुबाजू ला जंगल होते. डाव्या बाजूने पाण्याचा आवाज येत होता.. पण लोक वस्ती अजिबात नव्हती. शेवटी रस्त्याच्या डाव्या बाजूला लेडीज व उजव्या बाजूला जेंट्स असे ओकांनी ठरवले. मिळतील त्या पाण्याच्या बाटल्या घेऊन आमची टीम टीमवर्क करत होती. रस्त्यावरून कोणीही जात येत नव्हते ना कोणतीही गाडी पास होत होती. आता सर्वाना भूक लागली होती .. आंब्याचा सीज़न असल्याने रानातील सर्व आंब्या ची झाडे आंब्यानी भरली होती पण सर्वच काही गोड आंब्याची नव्हती . वारा सुटल्यामुळे आंबे खाली पडत व सर्व जण धावायला सुरवात करत. ज्याला मिळेल तो त्या आंब्याचा फडशा पाडे. आमच्यातल्या एका हरहुन्नरी मुलाने जंगलातून एक फणस शोधून आणला..तो फोडला .. नेहमी आपण कापतो .. पण हा फोडला .. अर्धा कच्चा होता तरी गोड होता.. नदी वर जाऊन काही जण पाणी घेऊन आले.. हे सर्व सुरू असताना आमचा मामा गाडी खाली मस्त घोरत पडला होता.. फक़त पक्ष्यांचेच आवाज बाकी कसलाही नाही. बहुतेकांच्या मोबाइल डिसचार्ज झाले होते किंवा कोणाला नेटवर्क नव्हते. शिवाय कोणालाही फोन करून तसा काही फायदा नव्हता. अनेक टीम मीटिंग्स झाल्या.. मार्ग काहीही नव्हता.. त्या रस्त्याने जोवर कुठलीही गाडी येत नाही तोवर तिथेच बसणे भाग होते. नीना ताई चे पेशन्स संपले होते.. मुलींची फारच गैरसोय झाली होती पण दत्ता कडे ही या वेळी काहीही मार्ग नव्हता. दुपारचे साधारण 12.30 वाजले प्रचंड भूक जाणवत होती.. आंब्याचा नॉशीया आला होता. शिवाय ऊन ही वाढले होते. रत्नागिरीचा प्रयोग कॅन्सल केला गेला होता. ( दत्ता कडे त्यांचा नंबर होता म्हणे व त्याचे नेटवर्क reliance होते )..
आणि अचानक चैतन्य आले .. दूरवर पाळतीवर बसलेल्या मूलाना एका गाडी चा आवाज आला. सर्व जण रस्त्यात उभे राहिलो.
जो कोणी असेल त्याला आडवा
उगाच सगळे पुढे जाउ नका तो घाबरेल
त्याला पैसे ऑफर करा
बायकाना घेऊन जा म्हणाव.. नीना
नको नंतर तुम्हाला शोधायला कोण येणार.. गिरीश ओक
पण तो कुठे जातोय हे तर कळायला हवे ना.. मुक्ता
कुठे ही गेला तरी त्याच्या बरोबर जा आणि खाण्याची व पाण्याची सोय करा.. मी
परत कसे येनार..स्मिता
अरे रिक्षा बिक्षा मिळेल ना.. मी
रिक्षा एवढ्या जंगलात येईल का ..स्मिता
अरे आधी ती गाडी तर येऊ दे.. गेलात तर माझ्या सिगरेट आणा.. जेवण नसले तरी चालेल एक वेळ.. शाम तेंडोलकर
प्रत्येकाच्या आपल्या डिमांड्स होत्या.
एक टॅंकर ट्रॅक्टर ला जोडुन आला. त्याला थांबवला.. सर्व स्टोरी सांगितली.. त्याने लगेच काही गॅलन पाणी दिले, देवदूत च तो.. लगेच काही जण जंगलात पळाले. त्या ट्रॅक्टर वर दत्ता महाराज विराज मान झाले व तो ट्रॅक्टर दापोली च्या दिशेने निघाला. या वेळी तो जरा अधिकच स्लो चालला होता कारण दत्ता पहिल्यांदाच ट्रॅक्टर वर बसला होता. 3 वाजता एक गाडी आली. टाटा मोबाइल.. त्यात दत्ता ने केलेली शॉपिंग व दोन मेकॅनिक होते. सर्वानी मनसोक्त वडा पाव व केळी खाल्ली. भरपूर पाणी प्यालो व गाडी दुरुस्त होण्याची वाट पहात बसलो..
साधारण 2 तासानी मेकॅनिक गाडी खालून बाहेर आले तेव्हा ते पूर्ण काळे झाले होते.
हयसर नाय होऊची .. कसलो तरी मेजर फोल्ट आसा .. गाडी मागे ग्यारेज मध्ये नेउची लागतली.. ड्रायवर खडे गेलो ..उठवा त्याका...
आणि मधे च बंद पडली तर..
मागे सगळी उतरण आसा.. प्रोब्लेम चढण्या चो आसा उतरुचो नाय .. logic.
दत्ता शी सल्ला मस्लत करून असे ठरले की आपण परत प्रभावळकराच्या लॉज वर जायचे.. ( 'अरे देवा'.. मी )
व उद्या सकाळी प्राईवेट गाड्यानी डाइरेक्ट गोवा गाठायचे. आज चा दिवस तर फुकट गेला. कलाकार सर्व जण मेकॅनिक च्या टाटा मोबाइल मधे बसले व बाकी टीम बस मधे.. मी पहिल्यांदाच टाटा ची गाडी चालवली दापोली पर्यंत.
दापोली मधे जी मिळेल ती गाडी बुक करावी असा फतवा काढला होता दत्ता ने. अखेर आम्हाला 1 जीप, 1 मारुती ऑम्नी, व 1 टेंपो मिळाला. टेंपो ला सामान भरून रात्रीच रवाना केला व आम्ही लॉज वर येऊन जेवलॉ व झोपलो. आता उद्या सकाळी निघायचे गोव्याला .. ( ब्रेक घ्या पुढे बरेच घडणार आहे )
देहभान च्या टीम बदल थोडेसे लिहितो.. एक सॉलिड टीम होती, नाटक जरा वजनदारच होते पण आम्ही ते लीलया पेलले होते.
नीना ताई : अत्यंत पर्फेक्ट आर्टिस्ट.. विजया मेहतांच्या दिग्दर्शना मधे शिकलेली. प्रयोगात जराही ऊन्निस बीस तिला चालत नसे. असे काही घडले तर सरळ समोरच्याला सरळ करत असे.. मग तो कलाकार असो , लाइट वाला असो , म्युझिक वाला असो वा खुद्द प्रोड्यूसर असो.. मनाने फारच प्रेमळ होती .. पण प्रयोगा नंतर.
डॉक्टर गिरीश ओक : एक मंझा हुआ कलाकार.. मदतीसाठी सदैव तत्पर. कोणताही प्रश्न पडला की सरळ त्याना विचारावे व त्यांच्या कडील अनुभवातून उत्तर तयार.. ते आपल्या बरोबर स्टेज वर असण्याचे कधीही दडपण जाणवले नाही. स्टेज वरील कसलीही चूक ते सहज सांभाळून घेत. मी बरेचदा त्यांचा रूम पार्टनर असे ..त्या मूळे त्यांचे प्रगल्भ अनुभव ऐकण्याचा लाभ होत असे.. त्यांच्या एवढा " अनुभवी " माणूस त्या नंतर मला कधीच भेटला नाही.
स्मिता सरवदे : तिला मोन्टो म्हणत ..तिच्या मधे एक लहान मुलगी दडलेली आहे.. अजुन आहे. कामात अत्यंत पर्फेक्ट .. जराही चूक होणार नाही.. नाटकाचा साचा ठरलेला. जे ठरलाय तेच जसे च्या तसे सादर करणे हे सोप्पे काम नव्हे. मला तर आयुष्यात कधीच जमले नाही. ती माझ्या पहिल्या नाटकातील माझी पहिली हीरोइन होती. इथे परत एकत्र काम करत होतो .. काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि यापुढे ही या मुली बरोबर काम करण्यात मला काहीच प्रॉब्लेम नसेल.
मुक्ता बर्वे : अत्यंत शांत सोज्वळ घरगुती सालस ती कधीच नव्हती. अनेक खोड्या,मझाक,मस्ती या सर्वांचे एक प्रेमळ पॅकेज म्हणजे मुक्ता. अभिनय जबरदस्त. ती चुकुन मुलगी जन्मली असे वाटे कधी कधी . माझी उत्तम मैत्रीण. बोलायला कोणी मुलगा नसेल तर तिच्याशी बिनधास्त बोलावे.
शाम तेंडोलकर : सीनियर मोस्ट.. रिटाइर्ड एअर फोर्स अधिकारी.. कामात पर्फेक्ट.. मिश्किल तर ते आहेतच.. पण काळ वेळ ठरलेली.. ठरल्या वेळी त्यांचे विमान आकाशात उडायचे .. मग ते फार कोणाशी बोलत नसत .
ययाती राजवाडे : याच्या बद्दल लिहायचे म्हणजे एक पुस्तक छापावे लागेल. हुशार पण.. टॅलेन्टेड पण.. मनमिळावू पण.. असो. मस्त होता.
आणि उरलो मी.. स्वता: बद्दल किती सांगू .. सर्व गुण संपन्न..असो .
लेखक अभिराम भाडाकमकर व दिग्दर्शक कुमार सोहोनी हे सर्व आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.
नाटक तीन काळा मधे घडत असल्याने बॅक स्टेज वाल्यांची पण कसरत होत असे. कपडे पट , लाइट, मूझीक सर्वानाच अलर्ट राहावे लागे.
असा आमचा ग्रूप .
सकाळी सात वाजता दापोली सोडले. मी मुद्दामच कलाकारांच्या ऑम्नी मधे न बसता बॅक स्टेज च्या मित्रा बरोबर जीप मधे बसलो. रस्त्यात कुठेही थांबत, आंबे काढत, आमचा प्रवास सुरू झला.. एरवी बस असताना असे मधेच थांबता येत नाही ना. 1 वाजता गोव्यातील हॉटेल वर पोहोचलो . फ्रेश झालो . सरकार तर्फे 3 रूम मिळाल्या होत्या कलाकरा साठी. 5 वाजताचा प्रयोग होता . साधारण 3 वाजता मी थियेटर ला पोहोचलो. थोडी खरेदी वगैरे ही केली होती. 4 वाजता नीना ताई, स्मिता , मुक्ता मेक अप ला बसल्या.. आम्ही मागेच टाइम पास करत होतो .. आम्हाला काही विशेष मेक अप नसे. आरश्यातून आमचे जोक्स सुरू होते.
आणि माझे लक्ष एका कोपर्‍यात गेले . कोपर्‍यात आमचा कपडे पट वाला सुधीर थरथरत उभा होता. मला लगेच लक्षात आले की काही तरी गडबड आहे
..कदाचित याने साडी बीडी जाळली असणार इस्त्रि करताना.. मी त्याला आरश्यातूनच बोलावले..
काय रे काय झाले? नीना ताई ची साडी जाळली असशिल तर तू कुत्ते की मौत मरशील ..मी
शशांक दादा मोठा प्रॉब्लेम झालाय..
काय?.. मी
सगळे कपडे बस मधे हॅंगर ला लावून ठेवले होते ते तिथेच राहीले... सुधीर
.......... (शब्द नाहीत..फ़क़्त *****) ( *** = सुधीर ला दिलेल्या शिव्या ) ... मी.
आता काय करूया.. सेट वाल्यांनी टेंपो मधे सामान भरले त्यात कपडे भरलेच नाहीत... सुधीर
............( शब्द नाहीत.. विचार सुरू).. मी
तू नीना ताई ला सांग ना... सुधीर
गप्प बस. नाटक सुरू व्हायला पाउण तास उरलाय .. नाटक तर करावेच लागेल.. चल माझ्या सोबत..
सुधीर ला घेऊन मी गिरीश ओका न कडे गेलो .. जाताना ****** . त्याना हे ऐकून काय करायचे तेच कळेना.. सुधीर ला ***** . मी म्हटले कपडे खरेदी करून आणावे लागतील.. या सर्वची भनक मुक्ता ला लागली होती .. ती ही या एमर्जेन्सी ओपरेशन मधे सामील झाली. थियेटर बाहेर गर्दी झाली होती लोकांची.. त्यात दत्ता ला शोधून काढण्यात आम्ही यशस्वी झालो . लोकांना कळेना कलाकार मेक अप करून धावतायात का व कुठे? दत्ता कडून जवळ जवळ पैसे खेचुनच घेतले ओकानी आणि मी, गिरीश ओक व मुक्ता एक रिक्षा करून मार्केट ला पोहोचलो. नाटक तीन वेग वेगळ्या काळात फिरायचे म्हणजे कपडे ही अनेक होते. हुशार सुधीर ने लिस्ट तयार करून दिली होती. रिक्षात पैसे वाटून घेतले व मार्केट मधे उतरलो. मार्केट एरिया व हातातली लिस्ट यांचे तीन तुकडे केले ओकानी. व खरेदी सुरू झाली..तीन जण तीन ठिकाणी कपडे शोधू लागलो . मनासारखे काहीही मिळत नव्हते.
तुमच्या कडे सफेद कुर्ता आहे.. मी
नाही.. पण माझ्याकडे ...दुकानदार
नकोय दुसरा .. मी दरवाज्यातुन .
सर्व जण साधारण अशीच खरेदी करत होते.. जे मिळेल ते जसे मिळेल ते.. साइज़ मोठी हवी बस. आम्हाला आमचे सह कलाकार मार्केट मधे या दुकानातून त्या दुकानात धावताना दिसत असत. थोड्याच वेळात खादी भांडार च्या कृपेने बरेच कपडे गोळा केले गेले. तसेच रिक्षा पकडून थियेटर वर आलो. व सर्व कपडे सुधीर च्या हवाली केले.
साधारण अंदाजाने लाव .. ओक
कसला अंदाझ.. सुधीर
कसला म्हणजे शोल्डर चा ..ओक
अहो तुम्ही ब्लाउज च्या जागी कुर्ता आणलाय.. नीना ताई फाडून खाईल मला..सुधिर
मग आता तू जा आणि आण ब्लाउज .. ओक
आयला कुत्र्या सारखे धावत आलोय **** ..ओक
शो होईल ना? .. दत्ता
गप रे.. नीना ला मी समजावतो .. ओक
अर्धा तास लेट झालाय लोक ओरडायला लागलेयत .. दत्ता
मग आता काय माफी मागू का ..तू रात्री बस चेक करायला हवी होतीस ना.. उगाच डोक खाऊ नको जा सुरू कर.. ओक..(वातावरण जरा तापले होते)
नंतर प्रयोग सुरू झाला.
(नवीन अनोळखी कपड्यांमुळे on stage झालेला गोंधळ मी इथे सांगत नाही.)
**********************
***********************
***********************
अखेर प्रयोग संपला.
( इथे ही ब्रेक घ्या.. अजुन बरेच घडायचे आहे)

नीना नावाचे वादळ आता शांत झाले होते .. त्या वादळात सुधीर नावाचा प्राणी भरडला गेला होता.. दत्ता गायब होता .
आता आमच्या कडे परत मुंबई ला जायला तिकिटे नाहीत हा मुद्दा निर्माण झाला . बस बिघडल्याने आमची परत जायची काहीच सोय नव्हती. ज्याला जे वाहन मिळेल त्याने मुंबई गाठा असे सांगण्यात आले . दत्ता , निनाताई , आणि डॉक्टर ओंक दुसऱ्या दिवशी विमानाने निघून गेले..( त्यांचा पगार जास्त होता) ययाती कोणाच्या तरी गाडीतून गेला.. तेंडोलकर आपल्या मुलीकडे गेले.. उरलो आम्ही तिघे .. मी , मुक्ता, स्मिता.. पैसे जेमतेम च शिल्लक होते ..पण २ दिवस पुरतील इतके होते. स्मिता ला हि urgent मुंबई गाठायची होती .. कसलेसे शूटिंग होते.. आता आमची हि मुंबई गाठायची धडपड सुरु झाली आणि आमच्या मदतीला धावून आले 'प्रमोद पवार' . सरकार तर्फे त्या फेस्टिवल करिता ते आमंत्रित होते व त्यांच्या कडे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे परतीचे तिकीट होते . ते म्हणाले '" तिकीट परवा चे आहे.. मी परत जात नाहीय कारण मला काही कामे आहेत व माझी मुलगी आलेलीच नाहीय त्यामुळे तिची सीट हि रिकामी आहे .. तेव्हा माझ्या जागी तू व माझ्या मुलीच्या जागी मुक्ता असे दोघे हि जाऊ शकाल.'" चला.. सोय झाली होती आता फ़क़्त उद्याचा दिवस गोव्यात काढायचा होता..तसेच उद्याच स्मिता लाही गाडीत बसवून द्यायचे होते.
माझ्या हातात स्मिता ची मोठी बॅग , मुक्ता च्या हातात खाण्याच्या वस्तू आणि स्मिता असे आम्ही सर्व जण बराच काळ ट्रेन च्या एका टोका कडून दुसऱ्या टोका पर्यंत अनेकदा धावत होतो. स्मिता साठी जागा शोधायची होती .. TC ला हि साकडे घातले होते.. पण गाडी फुल होती .. जागाच नव्हती. आम्ही नाट्य क्षेत्रात नवीन असल्याने त्या एव्हढ्या गर्दीत आम्हाला कलाकार म्हणून कोणीही ओळखत नव्हते .. त्यामुळे मदत मिळण्याचा प्रश्नच नव्हता.. पण जबरदस्त आत्मविश्वास होता .. काहीही करून स्मिता ला गाडीत घुसवणारच ( घुसावावेच लागणार होते..कारण खिशात तीघांपुरते पैसेच नव्हते. ) अखेर जनरल डब्यात तिला घुसवले.." काहीही झाले तरी उतरू नकोस .. तुझ्या भाऊ ना आम्ही फोन करून कळवतो ..ते येतील दादर ला .. अशा सूचना केल्या..तसेच तिच्या शेजारी बसलेल्यांना हि सांगितले " जरा लक्ष ठेवा पोरीकडे ".
मडगाव मस्त आहे हे बाहेर आल्या वर लक्षात आले कारण आता डोक्यावरचे ओझे कमी झाले होते.
पैश्या चा जेमतेम अंदाज घेतला .. आज चा दिवस काढायचा होता दोघांना व उद्या मुंबई .. नो टेन्शन ..
जीवाचा गोवा करायला सुरवात झाली. ( जीवाचा गोवा यात सर्व काही आले) . गोव्यात एकही माणूस दारू पिऊन पडलेला दिसत नाही ..गोव्याचा इतिहास बदलणार नाही इतपत काळजी आम्हीही घेतली.
अतिशय टेन्शन फ्री म्हणजे काय ते अनुभवले.. कुठेही कसे हि फिरलो.. वाट्टेल ते खाल्ले..' फेरी' ने पलीकडे जाऊन शिंपले गोळा केले ..शॉपिंग केले..(शॉपिंग म्हणजे काजू बिजू ).. जे मनाला येईल ते केले ... हॉटेल वर पोहोचलो तेव्हा धक्काच बसला .. हॉटेल ने मला सरकार तर्फे असलेली रूम काढून घेतली होती .. असो .. ती रात्र कशी बशी काढली... आता उद्या गाडीत बसायचे होते. दुपारची गाडी असल्याने पुन्हा सकाळी फिरलो.. उरलेली खरेदी वगैरे झाली आणि सामान घ्यायला हॉटेल वर गेलो तेव्हा प्रमोद पवार खालीच उभे होते..म्हणाले " चला मी हि येतोय .. माझा बेत बदलला" .. छातीत धस्स झाले. आता काही खरे नाही.. राहायला जागा नाही .. खिशात पैसे नाहीत.. रस्त्यावर झोपायची लाईन होती.. पण त्यातल्या त्यात समाधान म्हणजे मुक्ता ची सीट अजून शाबूत होती .. तिने जावे असे सुचवले मी पण ती मुक्ता होती .. नाही म्हणाली.. जायचे तर दोघांनी एकत्र. पंचाईत झाली होती.. पण मग सौभाग्यवती प्रमोद पवार म्हणाल्या " मी रेल वे मध्ये नोकरी करते .. तू चल.. गाडीत चढ..पुढचे बघू.. पडत्या फळाची आज्ञा मानून गाडीत चढलो .. दरवाज्यात बसून संपूर्ण मडगाव ते मुंबई प्रवास केला मी आणि मुक्ताने विथ आउट तिकीट .. कोणीही तिकीट विचारायला आले नाही. दादर ला उतरून स्टेशन च्या बाहेर आलो आणि दौरा संपला. असे अनेक दौरे मी केले आहेत.. आता बोला.