हल्लीच आमची सत्संग पाडली.. आता तिथे गगन चुंबी इमारती उभ्या राहतील . अनेक नवीन लोक राहायला येतील , चकचकीत इमारत ज्यात असेल जलतरण तलाव , अद्ययावत जिम , क्लब , मोठाली घरे , लिफ्ट , सुरक्षा रक्षक, जैन देरासर, शिव मंदिर, बगीचे वगैरे वगैरे. पहिल्या दुसर्या मजल्यावर राहणारे लोक आता सोळा सतराव्या मजल्यावरून एकमेकांना पाहतील , थंड हवा पटकन घरात घुसेल, खालची झोपडपट्टी दिसणार हि नाही , समोर नुसते मोकळे आकाश .. सुंदर चित्र .
१९८३ साली जेव्हा सत्संग भारती को ओप हौसिंग सोसायटी मध्ये राहायला गेलो तेव्हा आजूबाजूला जंगल होते . चाळी मधून बिल्डींग मध्ये राहायला जाणे खरेतर जीवावर आले होते. एकटे राहायची म्हणण्या पेक्षा दरवाजे बंद करून राहायची भीती वाटत होती. शिवाय सोसायटी नवीन असल्याने जास्त लोक राहायला हि आले नव्हते. मी हि लहान होतो . बाहेरच्या लाईट मुळे मला आमच्या खिडकीच्या काचेत भुतांसारखे आकार दिसत पहिले काही दिवस. एकदा वडिलांनी ती खिडकी उघडली आणि भूतांचा पर्दाफार्श झाला.
खर सांगायचे तर मी लिहायला बसलोय खरा पण नेमके काय लिहू काही कळत नाहीय. सोसायटी मधील माणुसकी बद्दल लिहू कि माणसांबद्दल लिहू ? पाण्याच्या समस्ये बद्दल लिहू कि मुलांच्या प्रेम प्रकरणान बद्दल लिहू ? माझ्या लहान पणाबद्दल लिहू कि माझ्या झालेल्या अपघातांबद्दल लिहू ? माझ्या मित्रांबद्दल लिहू कि मित्रांशी झालेल्या भांडणं बद्दल लिहू? राणे आजी बद्दल लिहू कि माझा मित्र रुपेश खोपकर बद्दल लिहू ? क्रिकेट बद्दल लिहू कि रात्र रात्र ज्या कट्ट्यावर बसलो त्या कट्ट्या बद्दल लिहू ? आमच्या मोटार साइकल बद्दल लिहू कि आमच्या दिवाळी च्या कंदील बद्दल लिहू ? दंगलीच्या वेळच्या सोसायटी मधील एकोप्या बद्दल लिहू कि सोसायटी पाडायची असे ठरत असताना एकमेकांबरोबर झालेले वाद व राजकारणाबद्दल लिहू ? या व अशा अनेक गोष्टी .. प्रत्येका बद्दल लिहायचे म्हणजे एक एक पुस्तक तयार होईल .
सोसायटी पडत असताना एकदा पत्र्याच्या आत डोकावलो आणि आमची बिल्डींग उभी दुभंगलेली पहिली .. डोळ्यात पाणी आले टचकन . अनेक वर्षांचा ऋणानुबंध तुटत होता . जास्त वेळ थांबू नाही शकलो तिथे.
आज सोसायटी च्या जागी दिसत आहे मैदान .. काही खड्डे , सळ्या , सिमेंट च्या पोती , अनेक मजूर..मात्र ओळखीचे कोणीच नाही ..
जाऊदे .. काळा बरोबर चालायला हवे .
No comments:
Post a Comment