Monday, December 17, 2012

आमचे उद्योग - धंदे .


साधारण ११ वि मध्ये शिकत होतो तेव्हा . बरोबरीचे सगळे मित्र हे माझ्या पेक्षा वयाने मोठे पण माझ्या आजुबाजुचेच होते. लग्न कोणाचेच झालेले नव्हते त्यामुळे भरपूर रिकामटेकडा वेळ होता . पैसे कमवण्या करिता काहीतरी केले तर आपल्या इतर गरजा म्हणजे नवीन जीन्स , सायकल , नवीन क्रिकेट चे सामान , स्वता : चे स्वता: च घेता येईल इतपत शहाणपण आले होते तेव्हा . पण करायचे काय हा प्रश्न नेहमीच पडायचा . शून्य भांडवली तसेच कॉलेज सांभाळून करता येणारा धंदा शोधायला हवा असे नेहमी वाटायचे . मग सेल्स रीप्रेझेनटेटीव म्हणून अनेक गोष्टी विकल्या . जसे चहा कॉफी चे मशीन ( कमाई २०० ते ५०० रुपये व रेल्वे चा पास ), फूड प्रोसेसर ( कमाई २०० रुपये ) , वॉशिंग मशीन चा डेमो देण्याचे काम ( कमाई २०० रुपये आणि कवर विकले कि ३०० रुपये अधिक), इलेक्ट्रोनिक तराजू ( पगार ४००० रुपये + कमिशन ) .. बरोबरचे इतर मित्र हि काही न काही करत असत पण आमच्या गरजा काही पूर्ण होत नसत . शिवाय हे सर्व कोणा न कोणा कडे नोकरी असल्याने बॉस चा सतत ओरडा पडायचा . एक दोघांनी तर मला कामावरून काढून टाकले होते . पैसे हि दिले नव्हते केलेल्या कामाचे .. असो ,, उबग आला या सगळ्याचा आणि मग डोक्यात धंदा करण्याचे विचार येवू लागले .. कसला करावा बरे .. पावाची एजन्सी .. नको सकाळी लवकर कोण उठणार ४ वाजता .. मिठाची एजन्सी .. नको भांडवल नाही ..शिवाय माल पावसात भिजला तर मेलो ... पेपर लाईन ... नको लोक हसतील .. शिवाय कॉलेज सकाळचेच .. काही सुचत नव्हते .. अखेर एक दिवस आमच्या बिल्डींग मध्ये गरुडा पेस्टी साईड या तेव्हाच्या मोठ्या कंपनी चे पेस्ट कंट्रोल वाले आलेले दिसले .. आम्ही बिल्डींग खालीच टाईम पास करत होतो .. त्यांचे एकंदर काम पाहून माझे व माझा मित्र रवी चे डोळे चमकले .. साला हा धंदा बारा आहे . आपण नुसत्या ऑर्डर आणायच्या आणि काम या मुलांकडून करून घ्यायचे .. पाचच मिनिटात धंद्याची लाइन तयार झाली . लगेच त्या मुलाशी संदीप शी बोलणी केली .. आम्ही ऑर्डर दिली तर काम करणार का आमच्या करिता ..? हो करेन कि .. पण मटेरीअल तुम्ही देणार का ?.. छे छे .. आम्ही कुठून आणणार ? ते हि तूच आणायचेस.. थोडे थोडे ढाप कि तुझ्या कंपनी मधून .. काम पक्के झाले पाहिजे . ( विचार करून ) बर बर .. मी बघतो ते .. पण मग पैसे जास्त लागतील .. किती ? कोटेशन च्या ६० टक्के .. वेडा आहेस कि काय तू ..तुला ६० टक्के दिल्यावर आम्हाला काय उरणार ? मग जाऊदे .. ठीक आहे ठीक आहे ..पण मग जेव्हा आम्ही माल आणायला लागू तेव्हा इतके नाही देणार तुला .. ठीक आहे .. फोन नंबर घेतला संदीप चा आणि नवीन धंदा सुरु झाला १० मिनिटात .. आता बिल्डींग मध्ये सर्वाना सांगायचे होते कि आम्हीही पेस्ट कंट्रोल करतो . तेव्हा लगेच आम्हाला contract द्या . एक महिना उलटून गेला पण आम्हाला काही केल्या एकही contract मिळेना . खूप अपेक्षा बाळगून होतो आम्ही . काही जणांना कोटेशन हि दिली होती .. आमची कोटेशन ची पद्धत मजेदार होती . किती एरिया आहे तो आम्ही संदीप ला सांगायचो .. त्याच्याशी घासाघीस करून एक रक्कम ठरवायचो ..त्यात आम्ही आमच्या गरजा जसे दोघांना जीन्स , पेट्रोल चे पैसे आणि धंद्यात उपयोगी पडणारे पंप घ्यायला लागणारे पैसे म्हणून १००० रुपये असे जोडायचो आणि कोटेशन द्यायचो . नाही म्हणायला छोटी छोटी अशी एक दोन contract मिळाली पण आम्हाला त्यातून १०० , २०० रुपयेच मिळाले .. काही मज्जा येईना .. सगळे पैसे संदीपलाच गेले. निराश होण्या इतपत परिस्थिती आली होती आणि अचानक एका मोठ्या कंपनी च्या बंगल्याचे काम आम्हाला मिळाले एका ओळखीच्या माणसा कडून .. १२००० रुपयांचे ... बंगला अंधेरी ला चिनाय कोलेज च्या आवारातील झाडात होता . बंद होता अनेक वर्ष .. खूप मोठा होता दोन माळ्यांचा ..अनेक प्रकारचे कीटक तीथे वस्तीलाच होते . बापरे हे सगळे काढायचे का .. संदीप ची तर वाट लागेल ..असे अनेक विचार मनात आले .. पण रवीच्या डोक्यात वेगळाच प्लान सुरु होता .. रवि : हे काम आपण संदीप ला न देत स्वता :च केले तर .. मी : अरे वेडा झालायस का .. किती किडे आहेत बघ शिवाय लाल तोंडाची झुरळे ती हि उडणारी .. बाहेरून संपूर्ण वाळवी लागलेली .. आत घुसणार कसे .. ई ई ई .. रवि माझ्या हून ५/६ वर्षे मोठा होता .. तो मला समजावू लागला .. हे बघ तो संदीप आपले सगळे पैसे घेवून जातो .. आपणच बाहेरून औषध आणूया .. आणि पंप भाड्याने मिळतो त्याने मारुया .. लांब हाताचा शर्ट घालायचा ..तोंड रुमालाने बंद करायचे .. जीन्स घालायची .. गॉगल लावायचा .. ग्लोव घालायचे आणि घुसायचे बिनधास्त .. बघ दोघानाही ४/४ हजार रुपये मिळतील नाहीतर ७०० /७०० रुपये . आयला खरेच .. मी हि शूर झालो .. चल तिच्या आयला .. झुरळांना काय घाबरायचे .. दिवस ठरला .. आम्ही भाड्याच्या पंपाच्या दुकानात गेलो आणि त्याच्याच कडून पेस्ट कंट्रोल चे औषध विकत घेतले.. २ लिटर .. पण हे पुरणार कसे .. दुकानदार म्हणाला " अरे इसमें केरोसिन डालो .. " अरे लेकिन बास बहोत आयेगी .. और कुछ नहीं डाल सकते क्या इसमे ? टरपेनटाईन भी डाल सकते है ..लेकिन वो जल्दी उड जायेगा .. चलेगा असे म्हणून रवि ने ५ लिटर चा कॅन विकत घेतला . रॉकेल पेक्षा स्वस्त हि पडला . बाहेरील वाळवी साठी ५ किलो DDT पावडर घेतली ..सामान रिक्षात टाकले .. आणि आम्ही मिशन वर निघालो . रवि म्हणाला मी आत औषध मारतो तू DDT फवार .. काम सुरु झाले .. साधारण २ तासांनी माझे काम आटोपून मी आत गेलो तेव्हा थकलेला रवि विजयी मुद्रेने हसत होता .. अनेक लाल तोंडाचे शत्रू धारातीर्थी पडले होते.. अनेक कीटक हि जायच्या मार्गावर होते . " बघितलस .. झाले सुद्धा .. तुझे बाहेरचे काम झाले का ? मी हि म्हटले हो .. सर्व भितींवर DDT मारलीय..शिवाय गच्ची त जाऊन झाडावर हि मारलीय .. आता बाहेर रात्र झाली होती .. आम्ही हातपाय धुवून सरळ घरी पोहोचलो .. रात्री उशिरा त्या contract देणाऱ्या माणसाला फोन केला रवीने .. " साहेब झाले काम .. उद्या येवू का पैसे घ्यायला ? ' पलीकडून : उद्या बंगल्यावर या ..तिथेच देतो तुमची रक्कम ..चेक हवा कि कॅश ? ...रवि : कॅशच द्या साहेब .. सामानाचे पैसे हि द्यायचे आहेत दुकान दाराचे..( असा असतो धंदा ) दुसर्या दिवशी सकाळी ११ वाजता आम्ही बंगल्यावर पोहोचलो तेव्हा तिथे ४ माणसे आलेली होती .. आम्ही जवळ गेलो तेव्हा ती आश्चर्याने आमच्या कडे पाहू लागली .. आम्ही हि हसून त्यांना अभिवादन केले . काय काम झाले ना पूर्ण ? तुम्हाला कीटक हटवायला सांगितले होते भिंती रंगवायला नव्हत्या सांगितल्या .. हे काय आहे समोर.. समोर चे दृश्य भयंकर होते सर्व बंगला हा बाहेरून DDT मुळे पांढरा फटक पडला होता तसेच सर्व झाडेही हिरव्याची सफेद झाली होती .. आजूबाजूला काही पक्षी मरून पडले होते .. ते पाहून मी आणि रवि हि पांढरे फटक पडलो .. या आत या .. असे शब्द कानावर आले .. आम्ही नकळत त्या साहेबाच्या मागे आत गेलो .. आतील दृश्य अजून भयंकर होते .. सर्व कीटक आणि लाल तोंडाची झुरळे पुन्हा तरतरी आल्यासारखी घरभर फिरत होती .. आम्हाला तर काय बोलायचे तेच सुचेना .. अहो काल तर मेली होती हि ..आज जिवंत कशी झाली ? साहेब म्हणाला ते आता त्यांनाच विचारा .. अजून दोन दिवस आहेत .. तेव्हड्यात हे सर्व पूर्ण करा नाहीतर एकही पैसा मिळणार नाही .. साहेब निघून गेला .. मैंने कहा था तुमसे केरोसिन वापरो ..तुमने टरपेनटाईन लिया .. वो उड़ जाता है .. असे साधे सोप्पे उत्तर दुकानदाराने दिल्यावर आम्ही हतबल झालो .. आता पुढे ? रवि म्हणाला आधी घरी जाऊ मग बघू .. घरी जावून लगेच संदीप ला फोन केला .. आमचे प्रताप ऐकल्यावर त्याने तर आम्हाला चु .. वेड्यात काढले . 10000 लागतील ..सम्पूर्ण बंगला ग्यारंटी सह .. 8000 हजारात सौदा पक्का केला .. खाया नहीं पिया नहीं ग्लास फूटा 12 आना ।। ' मराठी माणूस धंदा करू शकत नाही ' हे वाक्य चुकीचे ठरले असते जर आम्ही धंद्यात राहिलो असतो इतपत उत्साह होता आमच्यात ... पण झुरळे मेलीच नाहीत हो ..

No comments: