Friday, April 27, 2012

काव काव ..


मरणा नंतर जीवन नाही हे त्रिकालाबाधित सत्य..पण मरणा नंतर करण्यात येणारे विधी म्हणजे कावळ्यानकरिता ब्रेकफास्ट एवढाच काय तो त्याचा उपयोग... ते सुद्धा धड शिवत नाहीत त्या पिंडाला .. परवाच माझ्या दूरच्या काकांच्या कार्या करिता सकाळी लवकर उठून दादर स्मशान भूमीत जावे लागले. अनेक पेंगुळलेली माणसे आपापल्या आप्तेष्टांच्या कार्या करिता तिथे जमली होती . सर्वाना लवकर विधी आटोपून कामावर जाण्याची घाई होती.. ब्राम्हण हि तत्पर होते..जे रिकामे होते ते फोन वरून appointment fix करण्यात व्यग्र होते .. शिवाजी महाराज कमर पट्टयात जसे बिछ्वा लावत तसे काही ब्राम्हण धोतरात मोबाईल खोचून इथे तिथे फिरत होते .. गेलेल्या माणसा बद्दल दुःखाचा लवलेश कुठे हि नाही .. मी हि एका घोळक्यात उभा होतो ..सीरिअल मध्ये पैसे मिळतात का रे ? सीरिअल मधल्या बायका सॉलिड चालू असतात न ? अशा अनेक मूर्ख प्रश्नांना शिताफीने टाळत होतो. तिथे थांबणे गरजेचे होते नाहीतर काका रागावले असते... स्मशानात अजून छपराचे काम पूर्ण केलेले नसल्याने कोणाचा काका मामा आजोबा वरून उडताना तुमच्यावर नेम धरून शिटेल याचा काही नेम नाही ...असो . तर आम्ही ठरवलेला भट हा तिथला मुकादम असल्या सारखा वागत होता..पूजा सुरु असताना तो मधेच आजूबाजूच्या इतर भटजीन बरोबर अवास्तव बोलत असे .. शिवाय त्याला फोन आला कि आमचे काका व पर्यायाने आम्ही लटकलो... अखेर पूजा संपली व माझा चुलत भाऊ पिंडाचे ताट घेवून कावळ्यांच्या दिशेने निघाला .. भटजी त्याच्या घरचे कावळे असल्यागत त्यांना बोलवत होता .. काव काव या या ..चला पटकन शिवा पिंडाला .. बघा तुम्हाला आवडायचे म्हणून चॉकलेट लावलेय पिंडात...आणि खरेच त्याने जेम्स च्या दोन गोळ्या पिंडात ठेवल्या होत्या .. तो कावळ्यांच्या सवयी बद्दल इतके बोलत होता कि ते ऐकूनच बहुदा एकही कावळा काही जवळ फिरकेना ..आलाच एखादा तर पिंडाला न शिवता उडून जाई दूर... भटाचा पारा आता हळू हळू चढू लागलाय हे मला तरी जाणवत होते... जीव अडकलाय बघा कोणा मध्ये तरी ..कोणी यायचे आहे का कि कुणी अनेक दिवसांनी आले आहे ..त्याला नीट पहिल्या शिवाय शिवणार नाहीत काका पिंडाला .. बघा तुमच्यातला कोण तो .. पुढे आणा त्याला .. सगळेच माझ्या कडे पाहू लागले .. मला जरा ओक्वर्ड झाले .. कारण मी क्वचित अशा कार्याला जातो ..मी पुढे गेलो ...घ्या सीरिअल वाले आलेत तुमच्या भेटीला ..पण मला पाहून कावळा अजून दूर उडाला ..( माझ्या एखाद्या वाईट सीरिअल चा निषेध व्यक्त करावा तसा ).. आता मात्र भट भडकला काकांवर .. अहो काका आता झाले कि सगळे यथासांग .. जाऊदे कि आता लोकांना कामावर...शिवा कि आता ... त्याला आपल्या धंद्याची पडली होती.. जोवर हा पिंड शिवला जात नाही तोवर त्याला पैसे मिळणार नव्हते ना ...या सर्व गडबडीत माझ्या एका भावाचा फोन वाजला .. तो हळू आवाजात बोलू लागला फोन वर आणि इथे एक कावळा पिंडाला शिवला... लगेच भट ओरडला .. पहा पहा मी म्हणालो न कोणीतरी यायचे असणार शिल्लक.. पहा त्या येणाऱ्याचा फोन आला आणि लगेच कावळा शिवला पिंडाला.. आम्हाला कळते हे सगळे ...चला आता.. जायची घाई सर्वांनाच होती त्यामुळे माझ्या त्या भावाला बायको च्या आलेल्या फोन ची फार चर्चा झाली नाही ....

No comments: