Saturday, November 24, 2012

अपघात ..

या लेखात माझ्या शिवाय इतर जी काही नावे येतील ते माझे मित्र समजावेत. शिवाय गाडी म्हणजे मोटार साइकल समजावे कारण तेव्हा आम्ही सगळेच कॉलेज मध्ये शिकत होतो. कार परवडणारी नव्हती. तर आम्ही सर्व मित्र १५ पोरे एकत्र मोठे होत होतो. आमच्या सर्व मित्रांमध्ये मी वयाने सर्वात लहान . अर्थात त्यामुळे अतरंगी पणात कमी होतो असे कृपया समजू नये. हे सर्व मी लिहितोय ते माझ्या आणखी एका अपघाताबद्दल. थोडीशी प्रस्तावना वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही व मजा हि येणार नाही. इतक्या वेळा अपघात झाले कि आता त्यात मजा येवू लागली होती. प्रेमात वगैरे अपघात फार नाही झाले माझे पण मोटार सायकल चे वेड असल्याने त्याचे बरेच अपघात माझ्या नशिबी आले. अगदी आता हे दोघे वाचले नसणार असे म्हणावे इतपत भयंकर अपघात झाले पण जाको राखे साईया मार सके ना कोई हे खरे आहे.
नितीन याचा काहीच दिवसांपूर्वी अपघात झाला व त्याच्या गाडीचे फार नुकसान झाले होते . ती जिथे रिपेरिंग ला दिली होती तिथे त्या गाडीचे जुने पार्ट एजन्सी मध्ये पडले होते ते आणायचे काम नितीन ने आपला लहान भाऊ अजय ला सोपवले होते. वेळ रविवार सकाळ ८ वाजताची ..नुकताच झोपेतून उठून मी बाल्कनी मध्ये आलो होतो ..दात हि घासले नव्हते .. समोरच्या बिल्डींग च्या जिन्यात अजय उभा होता व बकरा शोधात होता .. ९ वाजेपर्यंत परत यायचे होते कारण रामायण ९ वाजता सुरु होत असे. मला पाहून अजय ने लगेच मला बुक केले. मी हि सकाळी सकाळी उंडारायला तयार होतो . फटाफट ब्रश केले. काहीतरी खाल्ले आणि घरी काहीही न सांगता अंधेरीला निघालो हाफ चड्डीत . नितीन ने त्याच्या मित्राची जुनी स्कूटर काही दिवसांसाठी आणली होती ती घेवून जायचे ठरले. मी स्कूटर बरी चालवू शकायचो आणि तसे मी अजय ला सांगितले पण तो म्हणाला आमची स्कूटर आहे मीच चालवणार, येताना वाटल्यास तू चालव. मी खूष. तेव्हा माझे वय होते १७ आणि अजय चे १८ . अंधेरीला जाऊन यायला फार तर १/२ तास लागला असता पण तो दिवस वेगळा होता.
आम्ही गोरेगाव ला हाय - वे गाठला अगदी ५ मिनिटात , स्पीड साधारण ७० आणि जोगेश्वरी च्या आधी जय कोच चे जंक्शन लागे. एका बाजूला महानंदा डेरी मध्ये मोठा हाय वे व पलीकडे जय कोच . आम्ही पहिले कि महानंदा मधून एक दुधाचा ट्रक येवून रस्त्यात आडवा थांबला त्याला बहुदा जय कोच जवळ जायचे होते व विरुद्ध बाजूने अनेक गाड्या वेगात येत असल्याने तो बापडा थांबला असावा. आम्हाला त्याच्या मागून जायला रस्ता मोकळा होता. आम्ही अगदी १०० मीटर वर असताना आणखी एक ट्रक येवून त्याच्या मागे उभा राहिला . आमची स्कूटर आता मागून जाऊ शकली नसती. मी जोरात ओरडलो " अजय ब्रेक अजय ब्रेक" २५ मीटर वर असताना अजय ओरडला " अरे ब्रेक लागत नाहीय ". २०,१५,१०,५,३,२.. आणि अचानक अजय ने स्कूटर त्या ट्रक च्या समोर फिरवली ..आणि दुसर्या क्षणी आम्ही हाय वे वरील विरुद्ध लेन वर आलो .. समोरून वेगात येणारी लाल रंगाची मारुती ओम्नी मला क्षणभर दिसली होती नंतर मोठा आवाज आणि सगळा अंधार ..
गाड्यांच्या होर्न च्या आवाजाने मला जाग आली तेव्हा बाजूला गर्दी होती. सकाळी फिरायला जाणारे लोक, रस्त्यावर संडासला जाणारे भय्ये वगैरे मंडळी आमच्या बद्दल अंदाज बांधत होती .. ट्राफिक दोन्ही बाजूला जाम झाले होते .. मी माझा अंदाज घेतला . काही पार्टस दुखत होते पण काही बरे होते. मी उहून उभा राहण्याचा प्रयत्न केला पण पायाला लागले होते. कोणीतरी हात देवून उभे केले आणि तोच जोरात ओरडला ' दिखता नही चुतीये?' मी परिस्थितीचा अंदाज घेतला . लोक भडकले असावेत असे वाटले .. मी त्या गर्दीत अजय ला शोधत होतो .. तो बाजूलाच पडला होता . मी इतर सर्व सोडून तिथे धावलो. अजय ला जास्त मार लागला होता . पण ठीक होता .. लोक जमलेले पाहून तो पडूनच होता रस्त्यावर.. मी गेल्यावर तो हि उठून उभा राहिला.. इतक्यात एक बुरखाधारी बाई आली व तिने सन्नकन अजय च्या मुस्कुटात भडकावली ..साले चालाने को आता नही तो चलाते क्यो हो ? अभी मेरे बच्चे मर जाते तो ..ज्या गाडी ला आम्ही आपटलो त्यात ती बाई व तिची मुले होती ..शिवाय तिची गाडी समोरून आत घुसली होती .. नशिबाने ती बाई जास्त काही बोलली नव्हती पण बाई चा आवेश पाहून काही भय्ये हि पेटले तेही बोलू लागले. मी तर एका भय्या वर सोलिड ओरडलो ..तेरे को मालूम है क्या यहा क्या हुआ था? फिर क्यो बीचमे बोल राहे हो ? चल निकल यहा से वगैरे वगैरे बरेच बोललो ..त्यामुळे आम्हाला वाईट पोरे समजून फार कोणी पुढे आले नाही त्या नंतर. हळू हळू गर्दी ओसरली ११.३० वाजले होते. आमची स्कूटर मरणा संन अवस्थेत बाजूला पडली होती. पुढचे चाक जमिनीत धसले होते व जवळ जवळ वाकडे झाले होते . शिवाय इतर बरेच खोचे पडले होते..समोरचा दिवा फुटला होता ..मोठीच पंचाईत होती. घरी कोणत्या तोंडाने जायचे हा प्रश्न होता.. आम्ही दोघांनी जवळ जवळ खेचून ती स्कूटर रस्त्यातून बाजूला केली ..त्या मुले रहदारी सुरु झाली. घरी काय सांगावे या पेचात आम्ही असताना तिथे एक हिरो सारखा दिसणारा मुलगा आला .. म्हणाला मेरा ग्यारेज ही नजदीक वहा ठीक हो जायेगा .. आम्ही त्या देवदूताला धन्यवाद दिले. त्या चू... ने गाडीवर धडा धड लाथा मारल्या इकडून तिकडून ५ /६ आणि गाडीचे चाक फिरु लागले. तो गाडीवर बसून गाडी घेवून गेला . आम्हीही मग त्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो चालत चालत ..मरत मरत .. जाऊन बघतो तर काय ..काय .. तो मुलगा आमची स्कूटर घेवून तिथे गेलाच नव्हता .. प्रचंड धक्का बसला आम्हाला .. वाटले गेली आमची स्कूटर चोरीला .. ग्यारेज बंद होते . आम्ही हताश पणे तिथेच बसकण मारली . त्राण संपले होते . अजय ला घरी फोन करण्याची हिम्मत होत नव्हती .. मरणाची भूक लागली होती .. साधारण १ तास आम्ही तिथेच बसून राहिलो आणि तासाभराने तो आला . आल्या आल्या मी त्याही अवस्थेत त्याची कॉलर धरली ..शिव्या बिव्या दिल्या सणसणीत.. म्हणाला आज संडे है ना पिक्चर का तिकीट लेने गया था अनुपम टोकीज ...आम्ही आधी ती स्कूटर ताब्यात घेतली .. ती आता पुन्हा सुरु झाली होती . वेळ खूप झाली होती ..तसेच निघालो आणि अंधेरी गाठली सुखरूप पणे . तिथले लोक हि आमच्या अवताराकडे चमत्कारीत नजरेने पाहत होते. जुने पार्ट एजन्सी मधून घेतले व तडक माघारी फिरलो .. आता लगेच घरी .. हाय वे वर माझी टोपी उडाली वार्याने आणि मागून येणाऱ्या डम्पर च्या खाली गेली ..त्याच्या चाकाला चिकटून गेली .. मनात आले बरे झाले आतमध्ये मझे डोके नव्हते. काळवंडलेले कपडे..लागलेला मार..सुजलेले अवयव ..अशा अवस्थेत आम्ही बिल्डींग मध्ये पोहोचलो तेव्हा दोघांच्या हि माता आपापल्या लेकरांची वाट पाहत होत्या.. टी व्ही वरील रामायण संपले होते ..नंतर घरी जे रामायण घडले ते समजून जा .

No comments: