Thursday, November 22, 2007

MI ANI TE DOGHE..


अचानक ते दोघे दिसले आणि मी घाबरलोच . डोळ्यांवरून सकाळची झोप पूर्ण गेली नसल्याने किंवा दृष्टी भ्रमाने ते दिसले असावेत असे वाटले , पण अर्ध्या तासाने चहा वगैरे घेवून झाल्यावार पुन्हा पहिले मी आरशात तरीही ते तिथेच होते . ते 2 पांढरे केस . पांढरे केस म्हणजे अनुभव , काळ्या दगडांवरील सफेद रेघ .., केस उन्हात नाहीत पांढरे झालेत वगैरे असंबद्ध वाक्प्रचार मनात गोंधळ घालू लागले . पण आरशातल्या त्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच गोंधळ दिसत होता .. आजवर स्वताला लहान समजणारा मी ..अनेक गोष्टीत घरातील मोठ्या माणसांवर विसंबून राहणारा मी ..भविष्याची विशेष फिकीर न करणारा मी ..आयुष्यात कोणतीही डेरिंग करायला सतत पुढे असणारा मी ..आरश्यात हादरलेला दिसत होता ..हे 2 पांढरे केस मला माझ्या म्हातारपणाचा जणू ट्रेलर दाखवत होते . आजवरच्या आपल्या सर्व समजुतीनं तडा देत म्हातारपण जवळ येत असते आणि आपण काळाच्या या रेटया पुढे हतबल असतो . य 2 पांढऱ्या केसांनी माझ्या जबाबदार्या अचानक वाढवल्या . मी वयाने मोठा झालोय हे मनाने नाही तर काळाने दाखवायला सुरुवात केली होती . आजवर आपण काय कमावले काय गमावले हे एकदा पाहावे मागे वळून असे मनात आले . आपल्या पेक्षा ज्यांचे केस अधिक पांढरे झाले आहेत त्यांची काळजी घेणे किती गरजेचे आहे ..मनात येवून गेले . भविष्यातील जबाबदार्या , आजारपण , शौक या सर्वांसाठी आताच तरतूद करायला हवी .
आता या पुढे रिस्क हि calculated घ्यावी लागणार .. 1 न 2 कितीतरी गोष्टी . या 2 केसांनी अचानक समोर आणून उभ्या केल्या . .
साला हे 2 पांढरे केस पटदिशी उपटून टाकले तर ..या कानाचे त्या कानाला कळणार हि नाही ..अजून एक विचार ..निर्धार पक्का झाला ..आजूबाजूला पहिले ..आपल्याला कोणी पाहत नाहीय न ?..नाहीतर नेमके कोणीतरी म्हणजे लहान भाऊ वगैरे टपकायचा आणि खिल्ली उडवायचा माझ्या पांढऱ्या केसांची .. शी .. माझे पांढरे
केस ...आता उपटून टाकल्यावर कसले राहतायत माझे म्हणा ...
कुणीही नाही आजूबाजूला याची खात्री पटल्यावर मी हातात फ्लीकेर घेतला ..आणि काळ्या केसांमधून वाट काढत मोठ्या कष्टाने त्या 2 म्हातार्यां पर्यंत पोहोचलो ..त्या दोघांना एकाच वेळी त्या फ्लीकेर मध्ये पकडले .. आता फ़क़्त 1 च झटका आणि मी माझ्या पूर्वावस्थेत ..
पूर्वावस्था ...अ ..अ ...म्हणजे मी काल होतो तसा ..कि ..कि ..त्याही पूर्वी मी जसा होतो तसा ..कि ..मी वयाने हि लहान होणार ..कि ..कि ..शी ..
माझे काहीतरी चुकताय असे वाटून गेले ..
पांढरे केस म्हणजे आयुष्यातल्या बर्या वैताची पावती ? विचारांची प्रगल्भता ? आता फ़क़्त बापाचे रोल मिळणार ? टक्कल असण्या पेक्षा पांढरे केस बरे .. मेहेंदी लावली कि कळणार हि नाही ..असे एकेक केस उपटत राहिलो तर एक दिवस टक्कल नक्की .. अरे बापरे .. भयंकर विचार .. सर्व पांढरे केस वाले असाच विचार करत असतील ?..
प्रकृती अनेक मार्गाने , कळत नकळत अनेक गोष्टी सांगत शिकवत असते ना . . मग असे घाबरून जावून कसे चालणार ?..अजून विचार .. बदल हा तर निसर्ग नियम आहे . आज जे काही आहे ते सर्व उद्या नसणार , निर्मिलेले सर्व उद्या नष्ट होणार .. मग त्यापासून किती दूर पळणार आणि कधी पर्यंत ? जे आहे ते जसेच्या तसे स्वीकारले तर? .. कवी वसंत आबाजी डहाके म्हणतात "सरते शेवटी काय तर आपल्याला जुळवून घ्यावाच लागते .. सभोवतालच्या काळाशी "
शेवटा पर्यंत न थांबता आताच जुळवून घेतले तर शेवटी कमी त्रास होईल .. स्वताची फसवणूक कशी करणार? नाही का ...
डोक्यातले वादळ हळू हळू शमत होते , आरश्यातील चेहरा आता मी ओळखू शकत होतो , फ्लिकर बाजूला झाला होता .
आता मी या 2 म्हातारया ना जपणार . .त्यांचे आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करणार .. येणाऱ्या सर्व पांढरया केसांना सन्मानाने मिरवणार .. म्हातारपणाला विशेष भविष्यकाळ नसतो .. पण या केसांचा वर्तमान चांगला करणार .. असे अनेक विचार करत असतानाच मागून मुलीची हक ऐकू आली .. बाबा ए बाबा .. भविष्य काळाची सकाळ झाली होती .नकळत हात केसांवरून फिरला आणि ते 2 पांढरे केस काळ्या केसात आनंदाने लुप्त झाले..

1 comment:

Madhura said...

मनापासून लिहिलंयस, खरं आहॆ वर्तमानकाळात जगताना आपलाही एक भविष्यकाळ असॆल याचं भान राहत नाही. अशी जाणीव झाली की दचकून ख-या अर्थानं 'जागं' व्हायला हॊतं. खांडॆकरांच्या ययातिची आठवण आली.
- मधुरा